कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारिख जाहिर करण्यापूर्वीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तारिख जाहिर केली. 12 मे रोजी मतदान, तर 18 मे रोजी मतमोजणी होणार असे टि्वट अमित मालवीय यांनी केले आहे. या टि्वटनंतर काही क्षणांतच निवडणूक आयोगाने 12 मे रोजी मतदान,15 मे रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केली. यानंतर अमित मालवीय यांनी आपले टि्वट त्वरित डिलीट केले. यामध्ये मतदानाची तारिख बरोबर ठरली, मात्र मतमोजणीची तारिख चुकली आहे.
कारवाई केली जाईल – निवडणूक आयोग
यावर योग्य कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असतानाच अमित मालवीय यांनी टि्वट केले होते. याबाबत पत्रकारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना विचारणा केली. यावर ते म्हणाले, की चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
टीव्ही चॅनल पाहून टि्वट केले –
तुम्हाला निवडणूक आयोगाने तारखा जाहिर करण्याआधीच निवडणूकीच्या तारखा कशा माहित झाल्या, अशी विचारणा केली. यावर अमित मालवीय यांनी एक इंग्रजी टीव्ही चॅनेल पाहून टि्वट केल्याचा दावा केला.