संशोधनाला नवी दृष्टी देणारे डॉ. जयसिंगराव पवार, भावनेपेक्षा पुरावे महत्वाचे, असे धोरण

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा !

0

संशोधन ही प्रक्रिया अशी आहे की सतत  कार्यरत असते. त्यात भावनेपेक्षा पुरावे महत्वाचे असतात, अशी डॉ. जयसिंगराव पवार यांची धारणा आहे. त्यांनी त्याच धोरणाने संशोधनाचे कार्य केले. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

शिवकालीन इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा, संशोधनाचा मुख्य विषय आहे. त्यांच्या आस्थेचा विषय आहे. याच इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचे चरित्रलेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. त्याहीपुढे त्यांचे महत्वाचे योगदान आहे ते राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्याचे. हे कार्य त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केले.

तडसर ते कोल्हापूर त्यांचा जीवन प्रवास

, सांगली जिल्ह्यांतील तडसर हे डॉ. पवार यांचे मूळगाव. शेतकरी कुटुंबात जन्म. त्यामुळे वडिलोपार्जित शेती करावी, असा विचार त्यांच्या मनात यायचा. शेतीतच काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा ते गांभिर्याने विचार करत होते. अर्थात त्यांनी ते केले असते तरी तिथेही काहीतरी वेगळे नवीनच निर्माण झाले असते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे काम त्यांच्या हातून व्हायचे असल्यामुळे. कोरडवाहू शेतात विहीर खोदण्याची त्यांची इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांना ते शक्य झाले नाही. शालेय शिक्षण संपल्यावर काही घटनांमुळे सगळ्या दिशाच बदलल्या. त्यांची शेती एका श्रीमंत गृहस्थाने विकत घेतली. दहावीनंतर पुढील शिक्षणाकरिता कराडला जाण्याचा विचार मनात घोळत होता. त्यासंदर्भात ते मित्रांसोबत गप्पा करत असताना त्यांचे एक शिक्षक तिथे आले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी ते कराडऐवजी राजाराम महाविद्यालयात आले. वर्ष होते १९५८. राजाराम महाविद्यालयामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे जीवन घडायला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सवंगड्यांनी तो विषय निवडला म्हणून त्यांनीही बी.ए.ला अर्थशास्त्र विषय घेतला. पण त्यात त्यांचे मन रमेना. ते इतिहासातच रमले. एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात प्रथम आले आणि तेव्हापासूनच संशोधक म्हणून कारकीर्दीला सुरूवात झाली. १९६५ मध्ये त्यांचा ‘इतिहास’ यावरचा पहिला लेख प्रसिध्द झाला. तीच इतिहास संशोधक म्हणून ओळख त्यांच्या कारकीर्दीची नांदी ठरली.

राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता

शाहू महाराजांनी वसतिगृहे काढली नसती तर आपल्याला शिक्षण घेता आले नसते, याबाबत कृतज्ञतेची जाणीव डॉ. पवार यांच्या ठायी आहे. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी शाहू महाराजांसंदर्भात काम करण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हे त्याचे मूर्तस्वरूप आहे. राजर्षी शाहूंचे जीवनकार्य आणि त्यांच्या कार्याच्या सर्व पैलूंची ओळख करून देण्याचे काम त्यांनी या ‘बृहद’ ग्रंथातून केले. हिंदी, इंग्रजीसह अनेक विदेशी भाषांतूनही हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. जगातील सर्व भाषांमधून हा ग्रंथ अनुवादित व्हावा आणि शाहूंच्या कार्याची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, अशी डॉ. पवार यांची मनोमनी इच्छा. त्यादृष्टीने अनेक पातळ्यांवर त्यांचे प्रयत्न सुरू असतात. शाहू, शाहू आणि शाहू …. असे शाहूंच्या विचारांनी गुरफटलेले झाड डॉ. जयसिंगराव पवार यांना म्हणता येईल. शाहूप्रेमापोटीच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालकपद अवघ्या एक रुपया मानधनावर स्वीकारले. त्या केंद्रामार्फत शाहूंशी संबंधित अनेक महत्वाची पुस्तके नव्याने प्रकाशित केली.

राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा तसा अलीकडचा काळ आहे. म्हणजे १९२२ मध्ये शाहू महाराजांचे देहावसान झाले. एवढ्या अलीकडच्या काळातील इतिहासामध्येही तत्कालीन इतिहास संशोधकांनी अनेक संभ्रम करून ठेवले होते. शाहू महाराजांसंदर्भात अनेक कपोकल्पित कथा पसरवून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, डॉ. मंजुश्री पवार यांच्यासारख्या संशोधकांनी शाहूंच्या कार्याकडे नव्याने लक्ष वेधले अन् त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. डॉ. संगवे यांनी शाहूंच्या कागदपत्रांच्या खंडांचे संपादन करून कोल्हापूरच्या राजाने किती सर्वस्पर्शी आणि कल्याणकारी कार्य केले आहे, हे जगभर पोहोचवले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहूंच्या सामाजिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्या दृष्टीकोनातून त्यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

वर्तमानाशी जुळता  धागा

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असे नाही. डॉ. पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच ते वर्तमानातील राजकीय, सामाजिक घटना-घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचे लेखन ते करत नसले तरीही समविचारी लोकांशी चर्चा करतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन नवी वाटचाल ते करतात. ते कधीही ज्येष्ठत्वाचा आव आणत नाहीत किंवा उपदेशकाची भूमिका घेत नाहीत. नव्या पिढीकडून नव्या गोष्टी मनःपूर्वक ऐकून घेतात. आपल्याहून पन्नास वर्षे लहान असलेल्यांशीही मैत्रीपूर्ण संवाद साधतात. सामाजिक क्षेत्रातील बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा करतात. राजकारणातील तत्त्वहीन गोष्टींबद्दल व्यथित होतात. फॅसिस्ट प्रवृत्ती, जातीय-धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींबद्दल संताप व्यक्त करतात. हे सर्व करताना शाहू विचारांचे अधिष्ठान असते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांचे मोठेपण सांगतानाच त्याचा वर्तमानाशी धागा जोडून वैचारिक मशागतीचे कार्य ते करीत असतात.

डॉ. पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या कार्याच्या पाठिशी उभे राहणे हा त्यांचा स्वभाव. कोणतेही चांगले काम, विचार, अशा व्यक्तीच्या पाठिशी ते ताकतीनिशी उभी करतात. अशा ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहात नाहीत. स्वतः होऊन दाखल होतात. त्यातही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे कार्य असेल तर ती आपली जबाबदारी आहे, असे मानून ते कार्यकर्त्यांच्या भूमिकेत उभे राहतात.  पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्लेषणात्मक इतिहास लिहिण्याचा संकल्प केला आहे. ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी त्यांच्याकडून तशी अपेक्षा व्यक्त केली होती. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवासमोर त्यांनी तसा संकल्प केला होता. शिवकालीन इतिहासातील चुकीची पाने फाडण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केले आहे. आता त्यांच्याकडून जे नवे लेखन येईल, ते स्वाभाविकच शिवकालीन इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, यात शंका नाही. हे काम त्यांच्याकडून लवकरात लवकर पूर्ण होवो, हीच सदिच्छा !!!

           – विजय चोरमारे

(लेखक विजय चोरमारे सहाय्यक संपादक महाराष्ट्र टाइम्स )

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.