वीजबिल भरू नका! राज ठाकरेंची गर्जना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेस आवाहन

वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा...

0

मुंबई : वाढीव वीजबिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. ‘वीजबिल भरू नका’, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचे निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकारांना देण्यात आले आहे. राज ठाकरे जोपर्यंत वीजबिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीजग्राहकाने वीजबिल भरू नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आले तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असे आश्वासन मनसेने नागरिकांना दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. आता मोर्चाच्या भाषेत समजावण्याची वेळ आली आहे. प्रचंड वीजबिलांद्वारे सरकारने जनतेला शॉक दिला आहे. सरकारने वीजबिलांमधून ‘जिझिया कर’ लावला आहे. राज्य सरकारकडून जनतेची लूट केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. वीजबिलांच्या विरोधात राज्यभरात निघालेल्या मनसेच्या मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्याने मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

‘मनसे’च्या भाषेत येथून पुढे आंदोलन

सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत येथून पुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर पोलिस आपले काम करतात. आम्ही आमचे काम करतो आहे, आम्ही डॉ. आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचे सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

औरंगाबाद मनसेचे आंदोलन चिरडले…

औरंगाबाद शहरात मनसेचे आंदोलन पोलिसांनी चिरडले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकाना ताब्यात घेतले असून महात्मा फुले चौकातून मोर्चा जाऊ दिला नाही. दुसरीकडे, मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे.

पुण्यात पोलिसांनी मोर्चा रोखला

वाढीव वीजबिलाविरोधात काढलेल्या ‘मनसे’चा पुण्यात पोलिसांनी रोखला आहे. महामोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलिस ठाण्यात आणले आहे. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. ‘मनसे’ मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत. फारसखाना पोलिस ठाण्यात ‘मनसे’ने धरणे आंदोलन सुरू केले आहे, जिल्हाधिकाऱ्यांना येथेच बोलवा, नाहीतर आम्हाला ताब्यात घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहोचताच तसे पोलिस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलिस स्टेशनला नेण्यात आले. मनसेच्या मोर्चाला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात मात्र मनसेने मोर्च काढत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. मनसेचे कार्यकर्ते झेंडे आणि घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले आणि त्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.