योगीजी विसरू नका, निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचे तख्त बदलले… : छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला इशारा
नाशिक : निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचे तख्त बदलले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. हाथरसची घटना मन विषण्ण करणारी आहे, असे भुजबळ म्हणाले.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निषेधार्ह असल्याचेदेखील भुजबळ म्हणाले. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसेच त्यांच्यावर लाठीचार्ज होणे हे निंदनीय आहे. देशाच्या संसदेतील एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक दिली जाती, तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल असेल, असे भुजबळ म्हणाले. तत्पूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. मग राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पायी रस्ता कापण्याचे ठरवले दोघेही यमुना एक्स्प्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्तेदेखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांच्या धक्काबुक्कीनंतर आणि राहुल गांधी यांच्या कॉलरला पकडून पोलिसांनी असभ्य वर्तन केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांच्या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. त्यांच्या हाताला मुकामार लागला. यानंतर प्रियांका गांधी काहीशा घाबरल्या. झाल्या प्रकरणावर बोलताना ‘अशा घटनांवेळी असे प्रकार होत असतात’, अशी संयमी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. नंतर मात्र पोलिसांनी राहुल गांधी यांची सुटका केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल गांधी यांना झालेल्या धुक्काबुक्कीचा ट्विटरवरून निषेध केला. “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातो”, असे पवार म्हणाले.