‘आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस’, रुपाली पाटील यांना ठार मारण्याची धमकी
मनसे नेत्या रुपाली पाटील यांची पोलिस संरक्षणाची मागणी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरेयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत धाव घेतली आहे.
रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मनसेकडून त्या निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर अशा भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधून त्या प्रचार करत आहेत. अशातच पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रुपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम एलएलबी झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.
पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज
पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सासत्याने भूमिका घेत असतात.