डोई संकटांचा डोंगर तरी सरसावला बळीराजा; रब्बी हंगामाची पेरणी सुरू

रब्बीतील पिकांच्या लागवडीमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता

0

परभणी :  जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर बळीराजा नव्या उमेदीने पुन्हा उभा राहिला आहे. जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून शेतजमीन पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे आता येथील शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीच्या तयारीला लागले. काही ठिकाणी अगोदरच रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवातही झाली.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा 75 टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतजमीनही खरवडली गेली होती. त्यामुळे अशा संकटातून शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, परभरणीतील शेतकऱ्यांनी खरिपातील दु:ख विसरुन रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केल्याचे आश्वासक चित्र पाहायला मिळत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने रब्बीतील ज्वारी, हरभरा तृणधान्य व कडधान्य पिकांच्या लागवडीमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी शेतकरी बागायती पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरी 2 लाख 15 हजार 961 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी 1 लाख 16 हजार 419 हेक्टरवर तर गहू 28 हजार 571 हेक्टर क्षेत्रावर व त्या पाठोपाठ मका 2 हजार 628 हेक्‍टरवर पेरणी होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय, हरभरा 63 हजार 363 हेक्टर तर 3 हजार 494 हेक्टर क्षेत्रावर शेतकरी करडईची पेरणी करतील, असा अंदाज आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.