ज्येष्ठ वयोगटातील ‘कोरोना’ रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला धीर

अतिदक्षता विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद

0

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता युध्दपातळीवर उपाय योजना हाती घेतल्या आहेत.  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रत्येक तालुक्यातील कोवीड सेंटर व विलगीकरण कक्षाला वेळोवेळी भेटी देऊन त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यानी  10 अतिदक्षता विभागांत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत धीर दिला

जिल्हाधिकाऱ्यानी  10 अतिदक्षता विभागांत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत धीर दिला. यामध्येच जिल्हाधिकारी जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा कोरोनाबाधित झाले. त्यानंतरही त्यांनी मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्याऐवजी शासकीय रुग्णालयात उपचार घेणेच पसंत केले. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतांना तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. या शिवाय रुग्णालयात सर्वांना मिळणारे भोजनही घेतले. एवढेच नव्हे तर इतर रुग्णांना दिले जाणारे भोजनच आपल्याला दिले जाते, याची खात्रीही त्यांनी केली. या सोबतच रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी करून आवश्‍यक सूचनाही दिल्या आहेत.दरम्यान, आज अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर असलेल्या १३ रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. बाबा, आम्ही तुमचीच मुले आहोत, तुमची योग्य काळजी घेत आहोत, तुम्ही धीर ठेवा, काही दिवसांतच तुम्ही बरे होऊन घरी जाणार, असा विश्‍वास बाळगा. तुमच्या काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे सांगा. त्या तातडीने सोडविल्या जातील, असे आश्‍वासन देत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना धीर दिला. तर रुग्णांनीही चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याचे सांगितले. यावेळी जयवंशी यांनी अतिदक्षता विभागात एक कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या शिवाय प्रत्येक वेळी त्यांची ऑक्सीजन लेव्हल व इतर बाबी तपासाव्यात. रुग्ण बरा झाल्यानंतर त्यांची दोन दिवस पूर्ण तपासणी करूनच त्यांना घरी सोडण्याच्या सूचनाही जयवंशी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, खुद्द जिल्हाधिकारी भेट घेऊन काळजी घेत असल्याचे पाहून तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचेही डोळे पाणावले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.