वाळूज औद्योगिक क्षेत्रात विविध समस्यांवर चर्चा आणि सुरक्षेसाठी उपाययोजना
मसिआ आणि एमआयडीसी अधिकारी यांची समन्वय बैठक
वाळूज : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) च्या वाळूज येथील कार्यालयात औद्यगिक संघटना आणि पोलिस विभाग, वाळूज यांच्यात वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या चोऱ्या, वाहतूककोंडी आणि त्यावर सुरक्षेकरिता उपाययोजना कशा करता येईल, याकरिता बैठक घेण्यात आली.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढले असून वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली. या समस्यांवर कोणते उपाय योजता येतील, याकरिता पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सदरील बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सर्व उद्योजक सदस्यांनी पोलिसांवर विश्वास दाखवावा आणि काही त्रास असेल तर पोलिस विभागाशी संंपर्क करावा, असे सांगितले. यावेळी औद्योगिक संघटनांना तीन प्रमुख उपाय सुचविले. 1) प्रत्येक कंपन्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा जेणेकरून चोरी झाल्यास पुढील तपासाला गती मिळवण्यासाठी त्याचे फुटेज अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 2) सकाळी आणि संध्याकाळी शिफ्ट सुटण्याच्या वेळेस वाहतूक कोंडी होते. याकरिता ज्या कंपन्यांचे काम शिफ्टमध्ये चालते, अशा सर्व कंपन्यांनी शिफ्टच्या वेळा बदलून थोड्या फार अंतराने वेळेत बदल करावा. जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊन सर्वांचा वेळ वाचेल . 3) रात्रीच्या पेट्रोलिंगसाठी काय उपाययोजना करता येतील, यावर विचारविनिमय करण्यात आला. गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यास उद्योगाची भरभराट होईल. त्याकरिता सर्वांनी पोलिस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले. वाहतूक पोलिस निरीक्षक साहेबराव उदार म्हणाले की, अनेक कंपन्यांच्या गेटच्या बाहेर बरेच ट्रक उभे असतात. सर्व संघटनांनी, औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाला कामगारांच्या गाड्या व ट्रक पार्किंग जागेतच लावण्यासाठी सूचना करावी. जेणेकरून वाहतूक कोंडी कमी आणि त्यामुळे अ्पघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल. सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींनी, पोलिस विभागाने कोविड- 19 च्या काळात उद्योगाला सर्वोतोपरी मदत केल्यामुळे आज येथील उद्योग पुन्हा उभे आहेत, असे सांगून त्यासाठी पोलिस विभागाचे धन्यवाद आणि आभार मानले. तसेच वाळूज औद्योगिक क्षेत्रात मसिआ, सीआयआय आणि सीएमआयए संघटना सर्व उद्योजक सदस्यांना संयुक्तपणे सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ड्राइव्ह घेतील तसेच वाहतूक कोंडी कमीसाठी मोठ्या कंपन्यांशी चर्चा करून शिफ्ट बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सर्व संघटनांच्या वतीने सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी पोलिस प्रशासनाला आश्वासन दिले. सर्व संघटनांच्या वतीने बैठकीसाठी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस स्टेशन, साहेबराव उदार, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग वाळूज तसेच औद्योगिक संघटना मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, आयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सीएमआयचे अध्यक्ष कमलेश धूत तसेच कार्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बैठकीसाठी मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, उपाध्यक्ष किरण जगताप, सचिव राहूल मोगले, कोषाध्यक्ष विकास पाटील. कार्यकारिणी सदस्य अर्जून गायकवाड, तसेच सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमण आजगावकर, तसेच सीएमआयचे अध्यक्ष कमलकिशोर धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, तसेच उद्योजक राम भोगले, उमेश दाशरथी व बजाज ऑटो लि. चे गुडिअर साऊथ एशिया टायर इंड्यूरन्स टेक्नॉलॉजी लि., कॅनपॅक इंडिया, एनआयपी, बीएव्हीए, या सर्व कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण बैठक सकारात्मक झाल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. असे प्रसिद्धी प्रमुख सचिन गायके आणि प्रसिद्ध प्रमुख सुमीत मालाणी यांनी सांगितले.