महाराष्ट्र नावावर केलात का? असे विचारणाऱ्या चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युत्तर
महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी दिले जशास तसे उत्तर
पुणे : पुण्यातील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर संजय राठोड व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता सचिन वाझे प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनेही वाघ यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
सचिन वाझे प्रकरणावर संसदेत आवाज उठवल्यामुळे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेले तक्रारीचं पत्र ट्वीट करून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘व्वा रे बहाद्दर… महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. धमक्या कसल्या देता,’ असे चित्रा वाघ यांनी अरविंद सावंत यांना सुनावले. ‘आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, असेही वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात, त्यांना एकच प्रश्न विचारा की तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? महाराष्ट्रात राहून शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा पीएम केअर फंडला मदत करणे यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही. हिशेब मागूनही जे पीएम केअर फंडाचा हिशेब द्यायला तयार नाहीत त्यांना जाब विचारा,’ असे चाकणकर यांनी वाघ यांना सुनावले आहे.