गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी धनंजय मुंडेंची भावनिक साद, पंकजा मुंडेंचा प्रतिसाद काय?
धनंजय मुंडेंनी एक प्रकारे पंकजा मुंडेंना घातली साद
बीडः भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती आहे. या निमित्ताने दरवर्षी गोपीनाथ गडावर खास भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला होता. यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले.
गोपीनाथ गडावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे नतमस्तक झाले. ते म्हणाले, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठे तरी आता घरात संवाद राहिला पाहिजे. त्या मताचा मी आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडेंना साद घातली. धनंजय मुंडे परळीला जात असता, ते म्हणाले, ज्या व्यक्तीसोबत मी राजकारणाची सुरुवात केली. विद्यार्थी दशेपासून सावलीसारखा अप्पांच्या सोबत राहिलो. 5 वर्षांची सत्ता सोडता मुंडे साहेबांचा काळ विरोधात गेला. स्वाभाविक कुठल्याही प्रश्नावर ते संघर्षाचा लढा उभा करायचे. कुठलाही प्रश्न ते संघर्षातून सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचे. जेणेकरून सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याचा विचार करावाच लागायचा. अशा सर्व गोष्टींच्या शिकवणीची आजही आम्हाला आठवण होत असल्याचे सांगत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.