धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नातेसंबंधावर रोखठोक भाष्य
आई कुटुंबाचा खांब बनली, पत्नीने प्रचाराची सांभाळली धुरा, आताही कुटुंब पाठीशी राहणार?
बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचे पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे त्यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नातेसंबंधावर रोखठोक भाष्य केले आहे.असे असले तरी धनंजय मुंडे यांचे सध्याचे ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ असल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. विशेषत: विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांचे कुटुंब प्रचारात दिसले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
धनंजय मुंडे यांचे कुटुंब
धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात आई, पत्नी, तीन मुली आहेत. मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तर दुसरी मुलगी 15 वर्षाची आहे. सर्वात लहान मुलगी 6 वर्षाची आहे. धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचे 13 ऑक्टोबर 2016 रोजी निधन झाले. धनंजय मुंडेंच्या मातोश्री घरीच असतात. पत्नी जयश्री मुंडे यासुद्धा गृहिणी आहेत. विधानसभा निवडणुकीत पत्नीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. एक महिन्यात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांची साद आणि कार्यकर्त्यांची मदत म्हणून धनंजय मुंडे यांनी बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.धनंजय मुंडे यांच्यावर सध्या बेताचा प्रसंग ओढावला आहे. रेणू शर्मा यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रसंगामध्ये धनंजय मुंडे यांचे कुटुंब या प्रकरणात त्यांच्या पाठीशी उभे राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.