धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतली भेट
अडचणीत सापडलेले धनंजय मुंडेंनी 'सिल्वर ओक'वर पवारांसमोर मांडली सविस्तर भूमिका
मुंबई :राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे संकटात सापडले आहेत. अशातच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (बुधवार) सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली.यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटे गुफ्तगू झाले. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (बुधवार) सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटे गुफ्तगू झाले. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर किंबहुना खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मुंडे यांनी ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांची भूमिका स्पष्ट केली. रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसेच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहीण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसेच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
आज पवार यांना भेटून हेच स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलेले असावे. कारण बुधावारी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये माझ्या जवळच्या लोकांना आमचे संबंध माहिती आहेत. तसेच कुटुंबाला देखील हे सगळे प्रकरण माहिती आहे, असे म्हटले होते. साहजिकच पक्षातील जवळच्या लोकांना धनंजय मुंडेंचे हे प्रकरण माहिती असावे, अशी अटकळ आता बांधली जात आहे. धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याची प्रतीक्षा आता राज्याला लागली आहे.
धनंजय मुंडे यांनी घेतली अजितदादा, भुजबळांची भेट
तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.