‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला दिला नाहक त्रास’, अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणी प्रतिक्रिया

कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करू नये', असे अजित पवार

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला.

‘बहुजन समाजातून आलेल्या माझ्या सहकाऱ्याला नाहक त्रास झाला, त्याला बदनाम केले, त्याला वाली कोण?’ असा परखड सवाल उपस्थितीत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.  पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांच्या नावाने तरुण नेतृत्व समोर आले आहे. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांनी मोठी जबाबदारी दिली. ते त्यांचे काम करत होते. पण, याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणे झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करू नये’, असे अजित पवारांनी यावेळी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले की, ‘सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना अचानक कुणीतरी येते आणि तक्रार करते. त्या तक्रारीमुळे एका झटक्यात नेत्याची प्रतिमा मलिन होते. लोकांच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. भाजपच्या लोकांनी आंदोलनं केली. राजीनाम्याची मागणी केली. ज्यांनी ज्यांनी राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी पूर्ण माहिती न घेता वक्तव्य केली. आता याला जबाबदार कोण आहे? एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करू लागला, तर त्याचे नाव लोकांत चांगले होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलने करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी धनंजयच्या राजीनाम्याची मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्ये केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण?’ असाही सवाल अजित पवारांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.