आमदार टिकवण्याकरिता दानवेंची धडपड अन् उलटसुलट वक्तव्ये
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतला रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार
जालना : भाजप आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना आपले आमदार टिकून ठेवायचे आहेत. त्यामुळे ते उलटसुलट वक्तव्ये करत आहेत. ज्यांना भल्या पहाटे स्थापन केलेले सरकार दोन दिवस टिकवता आले नाही, ते दोन महिन्यांत सरकार काय स्थापन करणार, या शब्दांत शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मंगळवारी बदनापूर आणि जालना येथे प्रचारसभा घेण्यात आल्या. या वेळी शिवसेना नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले. सगळा प्लॅन तयार आहे. विधान परिषद निवडणुका संपल्या की राज्यात दोन महिन्यांनंतर भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्याचा शिवसेनेने समाचार घेतला. आपले १०५ आमदार टिकवून ठेवण्यासाठी त्यांना असे वक्तव्य करावे लागत आहे, असे खोतकर म्हणाले. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही या वक्तव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, दानवेंना दोन महिने नाही, दोनशे वर्षे भाजपचे सरकार येणार नाही, असे म्हणायचे आहे, तुम्ही दोन महिने ऐकले, असे सांगत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. पुढची २० वर्षे राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार राहील, असेही ते म्हणाले.
दानवेंसारखे दहा आले तरी सरकार पडणार नाही
दरम्यान, दानवे यांच्यासारखे दहा जण आले आले तरी हे मानवतेचे सरकार पडू शकत नाही, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी परभणी येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. पदवीधर उमेदवाराच्या प्रचारासाठी ते येथे आले होते.