शिर्डीत वीज कार्यालयाची तोडफोड; ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोणी वीज कापण्यासाठी आले तर त्याच्या कानाखाली शॉर्टसर्किट

0

शिर्डी : वाढीव वीज बिलांविरोधातील आंदोलनावेळी कोपरगाव येथील वीज महामंडळाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुरुवारी संध्याकाळी गुन्हे दाखल करण्यात आले.

कोपरगाव येथील वीज वितरण कार्यालयाची या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, असे आरोप या कार्यकर्त्यांवर करण्यात आले आहेत. पाच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर आज सकाळी पोलिसांनी वीज कार्यालयातील तोडफोडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी वीज वितरणचा एक कर्मचारीही जखमी झाला होता. वाढीव वीज बिलांविरोधात मनसेकडून आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, सरकारचा आदेश झुगारून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसले. यापैकी मुंबई आणि ठाण्यातील मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

ठाण्यात पोलिसांकडून मनसेचा मोर्चा अडवण्यात आला. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स फेकून दिल्या. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘मनसे जिंदाबाद’, ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

मुंबईत प्रचंड मोर्चा

मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसेच्या भाषेत इथून पुढे सरकारला उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी आम्ही वीजबिल भरणार नाही. कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.