औरंगाबाद महापालिकेचा निर्णय; मास्क न घातल्यास कारवाई

दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी, कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता खबरदारी आवश्यक

0

औरंगाबाद  : दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आवश्यक ती खबरदारी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून बाजारपेठांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी विविथ पथके नेमण्यात आली आहेत. महापालिकेत चाळीस माजी सैनिकांचे पथक आहे. कोरोना काळात या पथकाचा उपयोग पालिकेने मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी केला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर देखील या पथकांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या पथकांना पुन्हा सक्रिय केले जात आहे.,

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. खरेदीसाठी येणारे काही नागरिक मास्क घालत नाहीत. सुरक्षित वावरण्याचा निकष देखील पाळत नाही. मास्क न घातल्यास, सुरक्षित वावराचा निकष न पाळल्यास पुन्हा करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हा संसर्ग वाढू नये यासाठी पालिकेच्या प्रशासनाने चाळीस माजी सैनिकांची विविध पथकांमध्ये विभागणी केली आहे. त्यांना गुलमंडी, पैठणगेट, सिटी चौक, औरंगपुरा, सिडको, कॅनॉट प्लेस, गजानन महाराज मंदिर परिसर, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, बीड बायपास परिसर आदी ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे. बुधवारपासून काही पथकांची नियुक्तीदेखील प्रशासनाने केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर या पथकातील सदस्य कारवाई करणार आहेत. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा,, असे आवाहन करण्यासाठी पथकांच्या माध्यमातून ध्वनीक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून सहा जीममध्ये  आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. रोषणगेट येथील एजी फिटनेसमध्ये बारा जणांच्या, रोषणगेट येथील आणखी एका जीममध्ये १४ जणांच्या, सिल्कमिल कॉलनीत १४ जणांच्या, सूतगिरणी परिसरातील जीममध्ये दहा जणांच्या आणि क्रांतीचौकातील जीममध्ये बावीस जणांच्या चाचण्या केल्या. त्यात एकही कोरोना पझिटिव्ह आढळला नाही. शहरातील जीममध्ये करोना चाचणी केली तेव्हा, सर्व अहवाल निगेटिव्ह आले. आठवडी बाजारांमधील चाचणीत केवळ एक कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीरबाजार येथील आठवडीबाजारात वीस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात एक जण करोना पॉझिटीव्ह आढळला. छावणी बाजारात २१० जणांची, चिकलठाणा बाजारात १३२ जणांची, तर रविवारच्या बाजारात ७२ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात एकही रुग्ण आढळला नाही.
कोविड सेंटरमध्ये २१४ रुग्ण
महापालिकेच्या क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या घटू लागली आहे. पालिकेच्या आठ कोविड केअर सेंटरमध्ये मिळून सध्या २१४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये ७२, किलेअर्क सेंटरमध्ये ४४, एमजीएम कोविड केअर सेंटरमध्ये २७, एमआयटी कोविड केअर सेंटरमध्ये बारा, पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १५, सिपेट येथील कोविड केअर सेंटरमध्ये ५१, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये १५ तर पीईएस येथील कोविड केअर सेंटरमध्ये सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.