राज्यात अतिवृष्टीमुळे मृत्यूचे तांडव, 28 जणांनी गमावला जीव
सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात, सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका
मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. यामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीमुळे 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एका जणाचा अद्यापही मृतदेह सापडला नाही. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर मध्ये मृत्यूंची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमध्ये एकूण 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी काठावर बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. माढा येथील ओढ्यातून चारचाकी वाहून गेल्याची घटना घडली. सांगली जिल्ह्यात देखील 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन 36 फुटांपर्यंत पोहोचली होती. सांगलीत पावसाने कहर केल्याने 90 मार्ग बंद करावे लागले होते. पुणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर सातऱ्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुंळ 513 जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी वीज पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आणि पीकविमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खरीप हंगामातील पिके काढण्याची कामे सुरू असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.