दानवे प्रीतमताईंचा अर्ज भरायला आले, त्या जिंकल्या, माझ्यावेळी नाही आले, मी हरले : पंकजा

”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे, - पंकजा मुंडे

0

औरंगाबाद : “रावसाहेब दानवे खासदार प्रीतम मुंडे यांचा फॉर्म भरायला आले आणि प्रीतमताईंचा विजय झाला, पण आमदारकीवेळी माझा फॉर्म भरायला आले नाहीत, मी पराभूत झाले” असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची खुशामत केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी दिली.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात होते. बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला.”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.“एका व्यक्तीचे तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहे. त्यामुळे मी पूर्ण काम करेन” अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली.“तिकीट देण्यावरुन मते व्यक्त केली, आणि मत आम्ही कानात बोलत नाही, जाहीर बोलतो, प्रवीण घुगे यांनी पक्षाच्या आदेशाने अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अर्ज बाद झाला तर उमेदवार असावा म्हणून भरला आहे” असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते.“मुंडे नावाला वलय आहे, काही लोक चर्चा करतात, पण मी त्याला घाबरत नाही, एखादा प्रश्न हातात घेतला तर तो तडीस नेण्याचा मी प्रयत्न करते. भाजप सरकारचे चांगले निर्णय रद्द करण्याचे काम हे सरकार करत आहे. आणि त्यांना न्यायालयाने चांगला चोप दिला आहे.” असेही पंकजा म्हणाल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.