सोशल मीडियामुळे सांस्कृतिक, राजकीय विभाजनाचा धोका – खासदार कुमार केतकर
'एमजीएम' आणि 'बामू' विद्यापीठाच्या पत्रकार विभागावतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष व्याख्यान
औरंगाबाद : जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे एकीकडे ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात आलेली असताना सोशल मीडिया आणि नवतंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे भविष्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विभाजनाचा धोका होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन खासदार तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
जागतिकीकरणाबरोबर जागतिक विभाजनसुद्धा वाढले. याचे कारण म्हणजे सोशल मीडिया हे लोकमाध्यम आहे. या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या असत्य माहिती आणि अपप्रचारामुळे विचारांचे विभक्तीकरण होत आहे. तंत्रज्ञानामार्फत काय सांगायचे आहे, हे महत्वाचे आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा लागेल, असेही ते म्हणाले. ‘दर्पण दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात ‘बदलती पत्रकारिता : नव्या दिशा, नव्या
अपेक्षा’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात त्यांनी मार्गदर्शन केले. एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविदयालय तसेच वृत्तपत्रविद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर गव्हाणे होते तर एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर प्राचार्य डॉ.
रेखा शेळके, वृत्तपत्रविद्या विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. दिनकर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात वरिष्ठ वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी यांनी ‘आजचा काळ आणि पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन केले,यावेळी पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहांवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, आपण आपल्या विचारधारेला अनुसरून पत्रकारिता करत असतो. परंतु, आपण हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, आपला विचार आणि आजूबाजूची स्थिती व परिस्थिती यामध्ये एक मोठी दरी आहे. आपली विचारधारा काहीही असो, परंतु आपण त्याची गल्लत पत्रकारितेशी करू नये. आधीच्या काळातील पत्रकारितेला लोकाश्रय दिला जात होता. परंतु सध्याच्या काळामध्ये या उलट परिस्थिती पाहावयास मिळते.
इंटरनेट येण्याआधी किंवा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांची आणि वृत्तवाहिन्यांची एकमेकांशी स्पर्धा होती. परंतु सध्याच्या घडीला या दोन्ही जनसंवाद माध्यमांची इंटरनेट किंवा समाज माध्यमांशी स्पर्धा सुरू आहे. आजची पत्रकारिता ही लोकाभिमुख आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या बदलत्या सवयींचा आढावा घेणे अत्यंत जरुरीचे आहे. सध्याच्या पत्रकारितेचे प्रवाह बदलत आहेत, बदलती पत्रकारिता ही लोकाभिमुख असावी. परंतु जनतेनेदेखील पत्रकारितेला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात केतकर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता ते सध्याची पत्रकारिता यातील तफावत स्पष्ट केली. सोशल मीडिया ही अफूची गोळी आहे, समाज माध्यमांमुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक आयुष्य ढवळून निघत आहे, वर्तमानपत्रांची कमी होणारी वाचनसंख्या तसेच त्यांचा घटत जाणारा खप हा कोविड-१९ मुळे नसून त्याचे मुख्य कारण हे तंत्रज्ञान आहे. कारण सध्या सर्वच वृत्तपत्रे ही मोबाईलवर आपणास उपलब्ध आहेत, काही वर्षांनंतर वृत्तपत्रे हे मुख्य मध्यम राहणार नाहीत. सामाजिक आणि सांस्कृतिक नवविचार रुजवणे आणि परिवर्तन घडवून आणणे हे नवीन पिढीचे काम आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून हे साध्य करावे, असे ते उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कार्यक्रमामध्ये व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला तसेच त्यांनी मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. सध्या माध्यम साक्षरता करण्याची गरज
असल्याचे सांगून नव पत्रकारांनी अत्यंत जबाबदारीने पत्रकारिता करावी, असे आवाहन अध्यक्षीय समारोप करताना डॉ. गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आशा देशपांडे यांनी मानले.