मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, दहीहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजन
जन्माष्टमी सोहळाही घरच्या घरी साजरा
मुंबई : दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजन पडले.
दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहावयास मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्मोत्सव पूजा-अर्चा करून साजरा करणार आहे. “सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसासाठी खासगी गाड्या सोडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी हंडी चांगल्या जल्लोषात साजरी करू”, असे मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले आहे.
शिर्डीतील साईमंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तांविनाच
देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी हा सोहळा भक्तांविना साजरा करणार आहे. तसेच यंदाचे चित्र वेगळे आहे. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अऩेक वर्षांपासून चालत आली आहे. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भक्त साई दरबारी येतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. काल रात्री साई मंदिरात 12 वाजता कृष्णजन्म झाल्यानंतर शेजआरती पार पडली. तर आज दुपारी 12 वाजता मंदिरात दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यासाठी गोपाळ काल्याच्या दिवशी दिवसभर साईंच्या समाधी शेजारी गोपाळ कृष्णाचा फोटो ठेवून पूजाविधी आणि आरती केली जाते. विशेष म्हणजे यावर्षी विश्वस्त आणि अधिकाऱ्यांएवजी कृष्ण जन्माच्यावेळी दोरीने पाळणा ओढण्याचा मान साई मंदिरातील भालदार-चोपदार, साईसेवक आणि फोटोग्राफर यांना मिळाला आहे. ठाणे शहरात अनेक गोविंदा उत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील खेवरा सर्कल येथे दरवर्षी मोठया धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठानने देखील आपला दहीहंडी उत्सव रद्द करून उत्सवासाठी होणारा सर्व खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत म्हणून देणार आहे. युती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष याच ठिकाणी पूरग्रस्थांना मदत करण्यात आली होती. स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी दरवर्षी मुंबई ठाण्यातून अनेक गोविंदा पथक हजेरी लावत असतात. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा युवा आमदार दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ गेली सलग 12 वर्षे पालघर जिल्ह्यातील युवा आमदार दहीहंडी उत्सव विरार पूर्व मानवेलपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक भान ठेवून यावर्षी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडी उत्सव आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकारी आदेशाचे उल्लंघन न करता साजरा करण्याचा निर्णय पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने घेतला आहे. सोशल डिस्टंन्सिग पाळून दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. “दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सरकारने अटी आणि नियम लागू केल्याने अनेक बाळ गोपाळ आणि गोपिकांना दहीहंडीच्या या थरार खेळातून मागे यावे लागले. तर यंदा कोरोनामुळे मोठया प्रमाणात उत्सवही साजरा होणार नाही. मात्र यावरही तोडगा काढत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने ठरवल्याचे पथकाच्या अध्यक्षा गीता झगडे यांनी सांगितले.”