पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा
पिंपरी चिंचवड :कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलिस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिस चौकशी करत होते. दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी शहरात काय परिस्थिती?
पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केल्यानंतर काल रात्री संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. अनेक नागरिक रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास घराबाहेर आढळून आले. नागरिकांच्या घराबाहेर पडण्याचे कारण काय? याची पहिल्यांदा चौकशी केली. जे नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडले त्यांना पोलिसांनी नियम समजावून सांगितले. काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांचे प्रबोधन केले. तर काही ठिकाणी आगाऊ लोकांना पोलिसांनी आपल्या लाठीचा प्रसादही दिला. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करत आर्थिक दंड वसूल केला.
पुणे, पिंपरी चिंचवडसाठी नव्याने काही निर्णय
कोरोनाला रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत. शाळा कॉलेज बंद– गर्दी होत असल्याने पहिल्या टप्प्यात 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा कॉलेज बंद असतील. अभ्यासिका सुरू असल्या तरी सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य राहणार आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट- रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे. वाहतूक व्यवस्था सुरू- शहरातील सर्व खासगी आणि सार्वजनिक व्यवस्था सुरू राहणार आहे. मात्र नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.