औरंगाबाद : जटवाडा येथील शरदचंद्र पवार निवासी मतिमंद विद्यालयातील मुला-मुलींना एकत्रित विवस्त्र अंघोळ घातल्याचा प्रकार पाच महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी बुधवारी हर्सूल पोलिस ठाण्यात विद्यालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापकांसह बारा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
समाजकल्याण निरीक्षक एस. डी. साळुंके या मार्चमध्ये या शाळेत पाहणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शाळेचे प्रवेशद्वार उघडे व सुरक्षारक्षक जागेवर हजर नव्हता. तसेच शाळेतील मुला-मुलींना विवस्त्र एकत्र आंघोळ घालण्यात येत होती. हे पाहून साळुंके व पथकाला धक्काच बसला. त्यांनी याबाबत मुख्याध्यापकास विचारले असता, रोज अशीच आंघोळ घातली जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुख्याध्यापक साजिद बादशहा पटेल, वसतिगृह अधीक्षक योगेश राठोड, काळजीवाहक राजेश महादेव निंबाळकर, मदतनीस शेख जाकीर मंजूर, पहारेकरी संतोष पवार, समितीचे अध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव साजिद पटेल, संस्थाप्रमुख बादशहा पटेल यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, साळुंके यांनी विद्यालयाची पाहणी केली असता, विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत काहीही खाण्यास दिलेले नव्हते. आंघोळीसाठी थंड पाणी दिले होते. स्वयंपाकघरात धान्य, भाजीपाला नव्हता. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत गाद्या, पांघरूण नव्हते. गतिमंद मुलांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे.