कोरोना रुग्णांचे बिल आधी ऑडिटरकडे, नंतर रुग्णांना देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ऑडिटरने तपासणी केल्या नंतरच मिळणार रुग्णांना बिल

0

नाशिक  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. पवारांनी नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. ‘सर्व ऑडिटर्सला एक एक रुग्णालयाची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी टोपे म्हणाले की, ‘राज्यात 3000 आरोग्य कर्मचारी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, सरकारी ऑडिटर ऑडिटर्सला एक-एक रुग्णालयाची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल रुग्णालय देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल. ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळे ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिले जाईल,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

यादरम्यान शरद पवार म्हणाले की, ‘मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. एका महिन्यापूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. मुख्यमंत्री फक्त या एकाच कामात लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री त्यांचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुंबईतील परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. लवकरच ते नाशिक दौरा करतील. आम्ही विविध दौरे करुन परिस्थितीची त्यांना माहिती देणार आहोत,’ असं शरद पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, ‘राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही आमची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते. नाशिक जिल्ह्यातील गरजू कोरोना रुग्णांसाठी मी रेमडीसिव्हीर या महागड्या औषधांची उपलब्धता करून 50 औषधे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली आहेत. याआधी देखील 25 औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मी नेहमीच पुढाकार घेईन.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.