कोरोनाने घेतला, कोरोना योद्ध्याचा बळी, रुग्णवाहिका चालकाचा दुर्दैवी मृत्यू
दुसऱ्यांच्या मदतीला धावणाराच देवाघरी गेल्याने, सर्वच स्तरांतून शोककळा व्यक्त
नवी दिल्ली : कोरोनाच्या धोक्यामुळे देशात हाहाकार सुरू आहे. अशात एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या या जीवधेण्या महामारीमध्ये असंख्य कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला. कोरोनाचा धोका असतानाही आपला जीव धोक्यात घालून गेली सात महिने दुसऱ्यांच्या मदतीला धावणाराच देवाघरी गेल्याने सर्वच स्तरातून शोककळा व्यक्त होत आहे.
दिल्लीच्या सीलमपूर येथे राहणाऱ्या आरिफ खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाची सेवा करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी आरिफ आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. आपला जीव धोक्यात घालून आरिफ यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली. आतापर्यंत त्यांनी तब्बल 100 पेक्षा जास्त कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी धावपळ केली. पण या सगळ्यात आरिफ यांनाच कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्यानंतर आरिफ खान हे रुग्णालयात उपचार घेते होते. पण देवदूतासारखे इतरांसाठी काम करणाऱ्या कोरोना वॉरिअरचा शनिवारी मृत्यू झाला. हिंदूराव रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरिफ यांच्या निधनावर उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही शोककळा व्यक्त केली. आरिफ खान हे गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगतसिंह सेवा दलामध्ये काम करत आहेत. इतकेच नाही तर ते मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवतात. 21 मार्चपासून आरिफ यांनी कोरोना रुग्णांसाठी काम केले. रुग्णांना रुग्णालयात नेण्यापासून ते मृतांवर अंत्यसंस्कारापर्यंत त्यांनी सगळी कामं केली. शहीद भगत सिंह सेवा दलाचे संस्थापक जितेंद्र सिंह शंटी यांनी आरिफला देवमाणूस म्हटले आहे. मुस्लिम असूनही आरिफने आपल्या हातांनी 100 हून अधिक मृतांना स्मशानभूमित नेत त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहे. त्यांच्या कामाचे सर्वस्तरांतून कौतूक होत होते. आपल्या जिवाची परवा न करता देशासाठी काम करणाऱ्या आरिफ यांना सलाम आहे. 3 ऑक्टोबरला आरिफ यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. कोविडची चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पण उपचारादरम्यानच, त्यांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल केले, त्याचदिवशी त्यांनी अखेरचा निरोप घेतल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. तर आरिफ यांच्या जाण्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पुढे येत आहे.