यवतमाळ : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका, नगरपालिका खडबडून जाग्या झाल्या असून कोरोना रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. यावेळी विदर्भात तर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळाला आहे. यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, नागरिक मास्क लावतात की, नाही त्याची पाहणी केली.प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचे संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्यांना दंडही केला. तसेच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.