औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, ‘लव्ह औरंगाबाद’ फलकाची तोडफोड
औरंगाबादमधील ‘लव्ह औरंगाबाद’ या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शहराच्या नावावरून वाद पुन्हा पेटला आहे. ‘लव्ह औरंगाबाद’ या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
औरंगाबद शहराच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते. ‘
‘लव्ह औरंगाबाद सेल्फी पॉईंट’ची तोडफोड, लव्ह औरंगाबाद’ आणि ‘सुपर संभाजीनगर’ वाद
औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून शहराच्या नावाच्या वादाने तोंड वर काढले आहे. शहरातील छावणी परिसरात ‘लव्ह औरंगाबाद’ हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचे पूर्वीचे नाव असलेले खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.
खासदार इम्तियाज जलील यांची टीका
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. इम्तियाज जलील यांनी ट्विटर पोस्ट टाकत शिवसेना चीप राजकारण करत असल्याचा आरोप केलेला. दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्य शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तीस वर्षांत महापालिकेने शहरासाठी केलेले रचनात्मक काम दाखवण्यासाठी नसल्यामुळे ते शहराच्या नावाचे राजकारण करत आहेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार असे वक्तव्य पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 9 डिसेंबरला केले होते. सुभाष देसाई औरंगाबादला विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली होती.