काँग्रेसची पुन्हा खदखद; आमच्या खात्यांवर अन्याय होत असल्याची भावना

आमच्याकडील खात्यांवर अन्यायाबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार - बाळासाहेब थोरात

0

नाशिक : महसलूमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असेही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.
वीजबिलांच्या प्रश्नावरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लॉकडाऊन काळात आलेल्या वीजबिलाच्या तक्रारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोडवल्या आहेत. नितीन राऊत यांच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध आहे, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. बावनकुळे वीजबिलाच्या प्रश्नावरुन काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत आले आहे. राज्याचे आर्थिक स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याला पगारांसाठी दर महिन्याला 12 हजार कोटींचे कर्ज काढावे लागते. मात्र, राज्य सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांनी ‘गुपकर करारा’मध्ये काँग्रेस सहभागी नाही हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींसोबत आधी भाजपाने युती करुन सत्ता स्थापन केली होती, आता भाजप नेते इतरांवर आरोप करत आहेत हा दुटप्पीपणा आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

मुंबई पालिका निवडणूक

राज्यात महाविकास आघाडी एकत्र सत्तेत आहेत. आगामी काळातील मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवू शकतात, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी लवकरच तिन्ही पक्षांची एकत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्र येत लढवल्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारताचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो. राज्य घटनेतील समतेच्या मूलतत्त्वाला छेद देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सूडबुद्धीने आहे का? याबद्दल माहिती नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.