शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी!

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप तरी एच. के. पाटील निर्णय प्रक्रियेतील प्रमुख व्यक्ती

0

मुंबई : भाई जगताप यांची नुकतीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि विविध समित्यांच्या नियुक्तीनंतर सर्वांना आपल्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी 100 दिवसांची योजना तयार करुन सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर एच. के. पाटील यांनी संपूर्ण कमान हाती घेतली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप असले तरी एच. के. पाटील निर्णय प्रक्रियेतील प्रमुख व्यक्ती बनले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांचीही भूमिका स्पष्ट झाली असून, त्यांना प्रत्येक आठवड्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील जबाबदारीचे वाटप केले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवली तर पक्षाच्या निवडणूक अभियानाचे प्रमुख म्हणून नसीम खान, समन्वय समिती प्रमुख अमरजीत सिंह मनहास, निवडणूक घोषणापत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी चंद्रकांत हंडोरे, आणि कार्यकारी अध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वांचा अहवाल एच. के. पाटलांकडे

मुंबई काँग्रेसमधील नियुक्त्यांनंतर सर्वांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. कुणीही एक-दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये, यासाठी या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. हे सर्वजण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याऐवजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना अहवाल सादर करतील.

कोणाकडे कुठली जबाबदारी?
भाई जगताप  : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे सदस्य नोंदणी अभियान राबवणे, मुंबई काँग्रेसचे सर्व फ्रंट, विभाग, सेलचे पुढील 45 दिवसांत पुनर्गठन करणे, सार्वजनिक सभा करण्यापासून 100 दिवसांत 100 किलोमीटरपर्यंत पदयात्रा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नसीम खान : निवडणूक अभियान समितीचे प्रमुख नसीम खान यांच्याकडे 15 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार उपसमितीची निर्मिती, त्यातील सदस्यांची निवड करण्यापासून अजेंडा ठरवण्याचे काम देण्यात आले आहे.

अमरजीत सिंह मनहास : ई काँग्रेस समन्वय समितीचे प्रमुख अमरजीत सिंह मनहास यांच्याकडे मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, राज्य सरकारमधील मंत्री आणि मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबादारी दिली आहे.

सुरेश शेट्टी  :  निवडणूक घोषणा पत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी यांच्याकडे काँग्रेसचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, भाजपच्या उणिवा शोधणे, राज्य सरकारने राबवलेल्या जनहिताच्या योजना समोर आणणे, मुंबईच्या विकासातील मुंबई काँग्रेसचे योगदान, मुंबई काँग्रेसचा प्रचार, अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सर्व पदाधिकारी  : सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये उपसमितीचा दौरा करण्यास सांगितले आहे. तसेच सर्व 227 वॉर्डांत पक्षाला मजबूत करण्यासाठी ताळमेळ राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.