जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदली, नवे जिल्हाधिकारी पदभार स्वीकारणार!
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती
औरंगाबाद : औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची यांच्या बदलीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. मंत्रालय सामान्य प्रशासनाचे अप्पर सचिव सीताराम कुंटे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडून १९ एप्रिल २०१८ मध्ये उदय चौधरी यांनी पदभार स्वीकारला होता.
शहरातील कचरा कोंडी तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती उदय चौधरी यांनी अतिशय शांतपणे हाताळली. त्याचबरोबर महसूल तसेच इतर कर्मचारी संघटनांशीही त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध राखत अनेक किचकट प्रश्नावर मात केली. गेल्या सव्वा दोन वर्षाच्या काळात प्रशासनावर योग्यप्रकारे अंकुश राखत जिल्ह्याचा गाडा हाकण्यात चौधरी यशस्वी ठरले, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. दरम्यान, औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जी. श्रीकांत सध्या लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कणखर आणि धडाडीचे जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची ओळख आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदाचा ते लवकरच पदभार स्वीकारतील असे बोलले जाते.