हिंदुत्त्वावर प्रश्न विचारणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर !

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका

0

मुंबई : राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्याचा मुद्दा अधोरेखित करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. पत्रात त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हे उपस्थित करत आता त्यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे का, असा सवाल केला. त्त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्रास उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका मांडली

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेले उत्तर पाहता, पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष राज्याच्या राजकारणात डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांच्या पत्राला आणि विशेष म्हणजे हिंदुत्त्व, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले.’आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’. धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, अशा रोखाने सूर आळवणाऱ्या राज्यपालांना केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या घटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेचा गाभा असणारी धर्मनिरपेक्षता मान्य नाही का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांच्या पत्राचे उत्तर दिले. जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच, ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. इतकेच नव्हे तर, राज्यपालांच्या पत्राचा गांभीर्याने विचार करत सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.