संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?; ‘वर्षा’वर तातडीची बैठक

वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार, हे जवळपास निश्चित. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव

0

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे वृत्त हाती येत आहे. शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी होत असून या बैठकीत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या निर्णयाबाबत अन्य नेत्यांना माहिती देतील, असे बोलले जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यात राठोड यांचा आवाज असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने सरकारवर हल्ले चढवण्यात येत आहेत. भाजपच्या महिला आघाडीने आज राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शने केली. त्याचवेळी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या सर्वामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य ती भूमिका घेतील, असे विरोधक म्हणत आहेत. त्यामुळेच सरकारची प्रतिमा जपण्यासाठी व अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

१ मार्च रोजी अधिवेशन सुरू होण्याआधीच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यात केवळ उद्याचाच दिवस उरल्याने आज घडामोडींना वेग आला आहे. त्यातूनच आता संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संजय राठोड हे अधिवेशनाआधीच राजीनामा देऊ शकतात, असे एका नेत्याने सांगितले. तसे झाल्यास महाविकास आघाडी सरकारसाठी हा पहिला झटका ठरणार आहे. दरम्यान, संजय राठोड प्रकरण व अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे. या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर राठोड हे मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवू शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.