मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर यूनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा करुन तपासाचे आदेश दिले आहेत.
“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांशीदेखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच संध्याकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी घटनेची चौकशी करण्याची मागणी करतानाच मृत्यू झालेल्या बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. 10 बालकांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारा आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.