शहरातील रस्त्यांसाठी आणखी 225 कोटी देणार, मुख्यमंत्र्यांची भूमीपूजन कार्यक्रमात घोषणा
औरंगाबाद : शहरात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 100 कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शहरातील रस्त्यांना विधानसभा निवडणूकीपूर्वी 125 कोटी तर पुन्हा सत्ते आल्यास आणखी 100 कोटी दिले जातील असे वक्तव्य केले. मात्र हे पैसे वेळेत वापरा असा सल्लाही त्यांनी महापालिकेला दिला.
18 महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम अनेक राजकिय नाट्यानंतर गुरुवारी अखेर पार पडला. रस्त्याच्या भूमीपूजनाला बिलंब झाला खरा, मात्र आता शहराचा विकास झाला पाहिजे. यापूर्वी 125 कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले होते. निवडणूकीपूर्वी पुन्हा तेवढीच रक्कम देऊ, जर पुन्हा आमची सत्ता आली तर 100 कोटी रुपये मंजूर करू. मात्र सरकारने पैसे दिले की ते वेळेत खर्च व्हायला हवे आणि शहराचा विकास झाला पाहिजे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
‘बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. आमचे सरकार बाजार समिती नष्ट करायला निघाले आहे, असा आरोप होत आहे. परंतु आमचे म्हणणे आहे, की बाजार समिती टिकल्या तर शेतकरी जिवंत राहतील. केंद्राने दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे, मात्र काही बाजार समित्यांच्या कारभारामुळेच हमीभाव शेतक-यांना मिळत नाही. बाजार समित्यांनी पारदर्शक कारभार करावा’ असा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला.
शेतक-यांच्या खात्यात जमा होणार मदत…
राज्यातील अनेक भागांत दुष्काळ परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतक-यांच्या पाठिशी उभे आहे. त्यांना पिण्याचे पाणी पुरविणे, चारा छावण्या सुरु करणे, दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी मी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. लवकरच शेतक-यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी फुलंब्री येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.
काँग्रेसवर केली टीका…
काँग्रेस दलाली करणारी पार्टी आहे. त्यांनी देशाचे संरक्षण विकले आहे. त्यांनी अगस्टा वेस्टलँड खरेदीतील घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून ते राफेल खरेदीतील भ्रष्ट्राचारावर कांगावा करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.