बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत; जिवाच्या आकांताने घरांना कुंपण

पाथर्डीमध्ये बिबट्याने चिमुकल्यांना पळवून ठार मारल्याचा आजचा तिसरा बळी

0

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पुन्हा बिबट्याने आणखी एका बालकाला उचलून नेल्याने नागरिक भयभीत झाले असून चिमुकल्यांचा नाहक बळी जात आहे. पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे आठ वर्षीय बालकाला, तर मढी येथील तीन वर्षीय चिमुरडीला बिबट्याने पळवून नेऊन ठार मारल्याची घटना ताजी असताना पाथर्डी शहर परिसरात व वाड्या वस्त्यांवर विविध ठिकाणी बिबट्याच्या वावर वाढल्यामुळे  नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथे एका चार वर्षांच्या बालकाला गुरुवारी सायंकाळी बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली. पाथर्डीतील मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथील चार वर्षांच्या बालकाला गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास उचलून नेले. बिबट्याला पकडण्यासाठी जळगावातील पथक दाखल  झाले आहे. परंतु अद्यापही याला वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत मढी देवस्थान समितीच्या सार्वजनिक भोंग्यावरून परिसराला सतर्क करण्यात आले. याबाबत वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क हाेऊ शकला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा वावर  आढळल्याने मणिकदौंडी, केळवंडी, रांजणी, घुमटवाडी, मढी परिसरात जिवाच्या आकांताने घराला कुंपण घालण्याचे काम नागरिकांनी प्राधान्याने हाती घेतले असून पाथर्डी शहरातील बाजारपेठेतून लाखो रुपयांच्या कच्च्या मालाचा उठाव झाला आहे. मणिकदौंडी, केळवंडी परिसरातील नागरिकांत, बीड जिल्ह्यातून आलेल्या वाहनाद्वारे पाच बिबट्यांना मणिकदौंडी घाटात सोडल्याची कुजबुज नागरिकांत सुरू आहे. या घटनेला वनविभागाचे काही कर्मचारी खासगीत दुजोरा देत आहेत. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव तज्ञ विवेक देसाई यांच्या नेतृत्वाखालील 12 जणांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून पाथर्डी वनविभागाच्या मदतीला कर्जत, जमखेड, श्रीगोंदा येथील वनविभागाचे 15 कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक दोन ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने बिबट्याचा ठावठिकाणा शोधत असून ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी विशिष्ट पद्धतीने योजना आखण्याचे काम सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहभागाने नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. वन्यजीव तज्ञ विवेक देसाई म्हणाले की,  केळवंडी येथे आठ वर्षांच्या मुलाला पळून नेऊन ठार केले, त्या घटनास्थळी बिबट्या पुन्हा येऊ शकतो, या शक्यतेमुळे त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. तसेच मोहरी रस्त्यावरील औटी मळा, भापकर वस्ती येथे एका मळ्यात तसेच गाडगे आंबराई रस्त्यावर बिबट्या दिस ल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समवेत परिसराची पाहणी केली. मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही. दरम्यान, गुरुवारी पुन्हा बिबट्याने आणखी एका बालकाला उचलून नेल्याने पाथर्डी तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी होत आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याची शोधमोहीम सुरू आहे. जोपर्यंत बिबट्या पकडल्या जात नाही, तोपर्यंत नागरिक भयभीत अवस्थेतच राहणार आहेत. ऐन दिवाळ सणात हे अरिष्ट आल्याने पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणखीनच भयभीत झालेले आहेत. पााथर्डी केळवंडी परिसरात पिंजरा लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी दिवाळीपूर्वीच फटाके फोडून बिबट्यापासून संरक्षणसाठी केविलवाणा प्रयत्न नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षीय बालिकेला पळवून नेले, त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला आहे. गावाातील नागरिक दहशतीखाली आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.