न्याय न मिळाल्याने नागरिकांनी अखेर सिमेंट रस्त्याचे काम पाडले बंद

भ्रष्टाचाराला साथ देणार्‍या भाजपच्या प्रशांत देसरडा यांनी पक्षाची लक्तरे टांगली वेशीला

0
 औरंगाबााद  : तब्बल दोन वर्ष नगरसेवकाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने नागरिकांनी अखेर टाउन सेंटर सिमेंट रस्त्याचे काम बंद पाडले. रहिवाशांचा रुद्रावतार पाहून अखेर यंत्रणा हलली अन् रखडलेली कामे मार्गी लागली. एकीकडे पंतप्रधान ना खाऊँगा ना खाने दूँगा, असे म्हणत भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे रस्त्याचे बोगस काम रोखणार्‍यांना भाजपचे माजी नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी हरामखोर म्हणत अकलेचे तारे तोडले.
चिस्तिया चौक ते एमजीएम या सिमेंट रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यालगत अनेक ठिकाणी विद्युत पोल आणि विद्युत डीपी बसवलेल्या आहेत. रहिवाशांच्या घरासमोरच मिनी डीपी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. रहिवाशांनी प्रशांत देसरडा यांच्याकडे अनेकदा कैफियत मांडली. गेल्या दोन वर्षांपासून रहिवाशी देसरडाकडे चकरा मारत होते. मात्र त्यांनी दाद दिली नाही. या रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांमध्येही वॉटर ड्रेनची व्यवस्था केली नाही. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले होते.  दुसरीकडे ड्रेनेजचे काम करताना  कंत्राटदाराने विटाऐवजी चक्क रहिवाशांच्या अंगणात असलेल्या पेव्हर ब्लॉकचा वापर केला. थातूरमातूर काम करून  उखळ पांढरे करणार्‍या या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रहिवासी एकवटले.
दुपारी बाराच्या सुमारास  एकत्र येत रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. रस्त्याचे काम बंद पाडले. ही बाब कळाल्यानंतर माध्यम प्रतिनिधीही तिथे पोहोचले. त्यामुळे कंत्राटदारासह  प्रशांत देसरडा ही सतर्क झाले. त्यांनी फोनाफोनी सुरू केली. माध्यमांपर्यंत ही बाब कोणी पोहोचवली, अशी दमबाजी देसरडा यांनी रहिवाशांना केली. पत्रकाराला हरामखोर संबोधत कितीही बातम्या- फोटो छापा माझे कोणी वाकडे करू शकत नाही, अशी गरळ ओकली.
या रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजचे काम करताना कंत्राटदाराने चक्क बोगसगिरी केली. ड्रेनेज वर उचलताना विटांचा वापर केलाच नाही. रहिवाशांच्या  घरासमोर असलेले पेवर ब्लॉक खोदून काढत त्याच ब्लॉकने ड्रेनेजचे बांधकाम केले. साईड वॉटर ड्रेनचे कामही कंत्राटदार करत नसल्याने हा रस्ता टिकणार तरी कसा ?
 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून ही कामे होत असल्याचा ढोल भाजप नेते पिटतात. भ्रष्टाचाराला मूक संमती देत भाजप नेते सेनेचे बटीक बनल्याचे दिसून येते. येत्या मनपा निवडणुकीतही भाजपचा हाच प्रमुख मुद्दा असणार आहे. मात्र भ्रष्टाचाराला साथ देणार्‍या भाजपच्या प्रशांत देसरडा यांनी पक्षाची लक्तरे वेशीला टांगली. आपल्याला राजकीय स्पर्धकच नसल्याचे पाहून त्यांनी आपले भ्रष्टाचारी घोडे सुसाट दामटल्याचे बोलले जाते.
देसरडा यांचे बोलणे चुकीचे : आ. सावे 
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असावे. आपल्या भागात होणारे काम योग्य आहे की नाही हे पाहण्याचा पूर्ण अधिकार जनतेला आहे. लोकप्रतिनिधींना प्रश्न करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना जर कुणी एकेरी भाषेत धमकीच्या स्वरात बोलत बोलत असेल तर ते चुकीचेच आहे. याबाबत आपण प्रशांत देसरडा यांचेशी बोलू.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.