बीड : मराठवाड्यातील बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शिक्षण क्षेत्र आणि पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी 22 वर्षांपासुन लढ्याला मुहूर्तरूप देण्याकरिता पदवीधर मतदारांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मराठवाडा शिक्षक संघ आणि संभाजी सेना, जुनी पेन्शन हक्क संघटना, ओबीसी भटके विमुक्त संघर्ष समिती, भारतीय मराठा महासंघ मराठवाडा यांचे पुरस्कृत उमेदवार रमेश पोकळे यांना निवडून द्यावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे यांनी केले.
पी.एस.घाडगे म्हणाले, सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे दिवसेंदिवस पदवीधरांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. ते सोडवण्यासाठी मला संधी द्यावी. मावळत्या आमदारांनी मराठवाड्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विधिमंडळात न बोलता शैक्षणिक संस्थांना राजकीय अड्डा बनवण्याचे काम केले. दुसर्या पक्षाच्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्राची जाण नाही, प्रश्नाची माहिती नाही, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय? दोन्ही पक्षांचे उमेदवारांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे मराठवाड्यातील गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी, शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधरांनी रमेश पोकळे यांना निवडून द्यावे. असे आवाहन पी.एस. घाडगे यांनी केले.
यावेळी घाडगे म्हणाले, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पक्षीय पातळीवर जाता कामा नये. मात्र पदवीधरांच्या प्रश्नामध्ये राजकीय पक्षांनी राजकारण निर्माण केले आहे. पक्षीय उमेदवार हे पक्षाच्या ध्येय धोरणाने काम करतात त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाने अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना आपला पाठिंबा दिला. रमेश पोकळे यांचा आजपर्यंतचा भूतकाळ अभ्यासला असता, शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी रमेश पोकळे यांनी आपला वेळ दिला आहे. आगामी कालखंडा देखील विधान परिषदेत रमेश पोकळे हे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवतील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात तसूभरही कमी पडणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदाराने रमेश पोकळे यांना आपले मोलाचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे, असेही घाडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Loading...