मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील!

आज मात्र पक्षप्रमुख म्हणून ते राजकीय भाष्य करतील : शिवसेना खासदार अरविंद सावंत

0

मुंबई : शिवसेनेसाठी महत्वाचा असणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनामुळे शिवतीर्थावर होणारा मेळावा सावरकर स्मारकात होत आहे. गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे भोगले ते महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्र,  महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे त्यांचे काम करत राहिले आज मात्र पक्षप्रमुख म्हणून ते राजकीय भाष्य करतील आणि विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व आहे. कारण ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले आहेत. शिवाजी पार्क मधील दसरा मेळाव्यात वेगळी मजा आणि ऊर्जा असते; पण यंदा कोरोनाची स्थिती पाहता हे शक्य नाही. मुख्यमंत्री स्वतः कोरोनाबाबत नियम करत आहेत. मग ते स्वतः कसे मोडणार? त्यामुळे सावरकर स्मारकात यंदा दसरा मेळावा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान सुरू केले आहे. त्यामुळे 50 लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. शिवसैनिकासांठी दसरा मेळावा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचांरांचे धन घेण्याचा सोहळा असायचा. शिवसैनिक मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचारधन आणि उर्जा घेऊन निघायचे. दसरा मेळाव्यातून देशाला दिशा देणारा विचार मिळत असे. राष्ट्रीयत्व, राष्ट्रधर्म यावर शिवसैनिकांना मार्गदर्शन व्हायचे, असे अरविंद सावंत म्हणाले. दसरा मेळाव्याला दरवर्षी लाखो शिवसैनिक उपस्थित राहायचे. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने कोट्यवधी जनतेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विचारधन पोहोचणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि यांतर ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते असे एकूण 50 जण उपस्थित राहणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.