ज्येष्ठ नेते विनायक पाटील काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली

0

मुंबई : सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाशिक जिल्ह्यातील  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, साहित्यिक, माजी मंत्री विनायक पाटील (७७) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आदी क्षेत्रांत काम केलेलं बहुआयामी नेतृत्व आपण गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कामाचा डोंगर उभा केला. शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला, असे मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आदराचे स्थान असलेले नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

अजित पवार यांची श्रद्धांजली

देशातील सहकारी वनशेतीचे जनक, अशी ओळख असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने शेती, वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य, अशा विविध क्षेत्रांत स्वतंत्र ठसा उमटवणारे, कर्तृत्वं गाजवणारं, दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व कवीवर्य कुसुमाग्रजांचा आशीर्वाद लाभलेल्या ‘वनाधिपती’ विनायकदादांचे निधन ही राज्यासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. वनशेतीच्या संदर्भातील त्यांचे विचार पुढं घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

छगन भुजबळ यांची श्रद्धांजली

देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून एक आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचे हरपले असल्याच्या शोकभावना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानंतर नाशिक येथील त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी होऊन नाशिकच्या द्वारका पंचवटी अमरधाम येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केले. पवार साहेबांचे ते जिवाचे मित्र होते. नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते, त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती, याची आठवण भुजबळ यांनी करुन दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.