इंदुरीकरांच्या विरोधातील खटला रद्द; भाजप नेत्यांनी केले त्यांचे अभिनंदन

समर्थकांकडून सोशल मीडियातून , ‘कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा’! अशा पोस्ट, सुटकेचा आनंद व्यक्त

0

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरूद्ध खटला चालविण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने रद्द ठरविला. त्यानंतर भाजप नेत्यांकडून इंदुरीकरांचे सत्कार सुरू झाले आहेत. तर त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून ‘कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा’! अशा शब्दांत सोशल मीडियातून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.
स्वत: इंदुरीकर यांनी मात्र जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे कीर्तनाचे कार्यक्रमही बंद आहेत.

गेल्या वर्षी कीर्तनातून पुत्रप्राप्तीसंबंधी वादग्रस्त व्यक्तव्य करून पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या तक्रारीवरून आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या जिल्हा स्तरीय समितीच्या शिफारशीवरून आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्याविरूद्ध संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर कनिष्ठ न्यायालयाने खटला चालिवण्याचा आदेश दिला होता. याविरोधात इंदुरीकरांच्या वतीने सत्र न्यायालयात पुनर्परीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने तो मंजूर करून खटला चालविण्याचा आदेश रद्द ठरविला. त्यानंतर आता भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आणि इंदुरीकरांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंदुरीकर आणि त्यांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांचे सत्कार केले जात आहेत. अकोले तालुक्याच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी इंदुरीकरांचा सत्कार केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही इंदुरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. आतापर्यंतच्या प्रवासात भाजपने साथ दिली, तशीच यापुढेही दिली जाईल, अशी ग्वाही नेत्यांनी इंदुरीकरांना दिली आहे. अभिनंदन करताना विखे पाटील यांनी त्यांच्याकडून निकालाची माहिती घेतली. यापुढील लढाईत महाराजांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे संकेतही त्यांनी दिले. भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांनी मधल्या काळातही इंदुरीकरांसोबत राहण्याची जाहीर भूमिका घेतली होती. न्यायालयीन कामकाज सुरू असेल्या काळातही त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. यापुढेही सोबत राहण्याची ग्वाही नेत्यांनी दिली आहे. संगमनेर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी सरकारकडून मात्र, अद्याप त्यासंबंधी काहीही निर्णय झालेला नाही. अंनिसने मात्र आव्हान देण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली आहे. संगमनेर सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी इंदुरीकरांविरूद्धचा खटला टळला आहे. आता त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांबद्दल उत्सुकता आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमिवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सध्या कार्यक्रम बंद आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर स्वत: इंदुरीकर यांनी अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियातून आनंद व्यक्त केला जात आहे. ‘कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा’! अशा पोस्ट करून सुटकेचा आनंद व्यक्त करतानाच महाराजांच्या कार्यक्रमांची पुन्हा दणक्यात सुरवात होणार असल्याचे संकेतही दिले जात आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.