नांदेड जिल्ह्यात दोन प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी मारून तर दांपत्याची संशयाने आत्महत्या

नांदेडमधील लोहा, हदगाव तालुक्यांतील घटनांनी उडाली खळबळ

0

नांदेड : नांदेड जिल्ह्यात दोन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याने जनमन स्तब्ध झाले. एका प्रेमीयुगुलाने एकमेकांचा विरह सहन हाेत नसल्याने हातात हात बांधून शेतावरील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुण अविवाहित असून तरुणीचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला. तर दुसऱ्या प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले. पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या या जाेडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. पतीने तब्बल अर्धा लिटर कीटकनाशक प्राशन केले तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दाेन घटना अनुक्रमे लाेहा तालुक्यातील वाळकी आणि हदगाव तालुक्यातील मनाठा येथे घडल्या.

विरहामुळे प्रेमीयुगुलाने संपवले जीवन

लाेहा तालुक्यातील वाळकी येथील धनराज कोलते या अविवाहित तरुणाचे गावातीलच कोमल कोलतेशी प्रेमसंबंध होते. घरातील मंडळींना या संबंधाबाबत माहिती झाल्यानंतर त्यांनी लग्नाला विरोध केला. लॉकडाऊनमध्ये कोमलच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न लावून दिले. दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नव्हता. दिवाळीनिमित्त कोमल गावी आली. दोन दिवसांपूर्वी धनराज हा मावशीच्या मुलीला आणायला जातो म्हणून घराबाहेर पडला. तेव्हापासून हे दोघेही जण बेपत्ता होते. दोन्हीकडील कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. बुधवारी (दि. १८) सकाळी दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. दोघांचे हात एकमेकांच्या हाताला बांधलेले होते. आत्महत्येपूर्वी विहिरीच्या काठावर त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली हाेती.

माहेरी आल्यानंतर प्रियकरासोबत आत्महत्या

आमचे नाते चुकीचे होते. त्यामुळे आम्हाला माफ करा. आम्हाला एकमेकांचा विरह सहन झाला नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करतोय. यासाठी कोणालाही दोष देऊ नका, भांडण करू नका, असा मजकूर विहिरीच्या काठावर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये होता. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार यापूर्वी देण्यात आली नाही. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती स.पो.नि. मुळे यांनी दिली.

नात्याला लागले संशयाचे ग्रहण

मनाठा ठाण्याअंतर्गत तरोडा येथील सुभाष लक्ष्मण बोरकर व प्रेमिला यांनी घरच्या मंडळीचा विरोध पत्करुन पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे दोघांच्या घरचा विरोध, हाताला काम नसल्याने संसारही अडचणीत आला. दाेघांनी मित्राच्या मदतीने औरंगाबाद गाठले. कंपनीत कामही मिळाले. दोघांचा संसार सुरू झाला. दोन मुले झाली. पाच वर्षे सुखात गेली. पण या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे मोबाइल रेकॉर्डिंग सुभाषच्या हाती लागल्यामुळे सुभाष हादरला. जिच्यासाठी घर सोडले, आई-बाबा सोडले तिने धोका दिल्याने सुभाषने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीचे निमित्त करून हे कुटुंब औरंगाबादहून मंगळवारी (दि. ११) तरोडा, ता. हदगाव येथे आले. रात्री घरी सुभाषने गोंधळ घातला. तिने मला धोका दिला, मला जगायचे नाही, असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पती-पत्नी दोघे औरंगाबादला जातो म्हणून घरून निघाले. पण सुभाषचा नातेवाइकांना संशय आल्यामुळे ते लगेच त्याचा पाठलाग करीत गेले. बामणी फाटा येथे सुभाषने एका कृषिकेंद्रावर कीटकनाशक विकत घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्याने ते घाबरून गेले. त्यांनी मनाठा पोलिसांनाही कळवले. त्यांनी लक्झरी बसचा नांदेडपर्यंत पाठलागही केला. पण ते दोघे भुवनेश्वर (ता.कळमनुरी) येथेच उतरले. दोघांनी गप्पा केल्या. सुभाषने स्वत:चा व्हिडिओ बनवला. दरम्यान त्याने अर्धा लिटर विष प्राशन केले. प्रेमिलाला विष घेण्यासाठी एक थेंबही औषध ठेवले नाही किंवा तिला पाजले नाही.

दोघांचे मृतदेह  आठ दिवसांच्या अंतराने आढळले

दोन दिवसाने सुभाषचा मृतदेह सापडला. पण प्रेमिलाचा मृतदेह सापडला नव्हता. ती औरंगाबादला गेली असेल का, तिनेही सुभाषसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण तिचा शोध लागला नाही. बाळापूर ठाण्यांतर्गत भुवनेश्वरला सुभाषने आत्महत्या केल्याने तपास सुरू असतानाच एक आठवड्यानंतर म्हणजे साेमवारी (दि.१६) भुवनेश्वरजवळील कॅनाॅल रस्त्यालगत प्रेमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. एका विवाहित प्रेमीयुगलाच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले. त्याचा शेवट दोघांचाही अंत होण्यात झाला. आई-वडिलांचे छत्र हरवल्याने दोन मुलं पोरकी झाली. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.