दगडूशेठ गणपतीची परंपरा खंडित, यंदा गणेशोत्सव मुख्य मंदिरात
यंदा गणेश उत्सव मंडपात नव्हे, तर मंदिरात करावे, पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला उत्त्म प्रतिसाद
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठचा गणेशोत्सव यंदा मुख्य मंदिरातच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गेल्या 127 वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. पुण्यात यंदा गणेश उत्सव मंडपात नव्हे, तर मंदिरात करावे, पोलिस प्रशासनाच्या या आवाहनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख हेमंत रासने, महेश सूर्यवंशी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि महापौरांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गणेशोत्सव साजरा करणार आहोत. गर्दी नियंत्रित ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “यंदा हा स्वल्पविराम असून पुढील योग्य परिस्थितीत साजरा करू. यंदा गणेशोत्सवाला मंदिराला प्राधान्य द्यावे. मंदिर नसेल तर छोट्या जागेत श्री प्रतिष्ठापना करावी”, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. मात्र, कोणतीही सजावट नको. प्रतिबंधित भागात रुग्णवाहिकेसाठी जागा ठेवण्याचे आवाहन महापौरांनी केले. तर, दरवर्षी साधारण पाच लाख घरगुती गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे यंदा घरगुती बाप्पांचे सुद्धा विसर्जन घरातच करावे. मंडळांच्या श्रींचे सुद्धा मंदिरात विसर्जन होईल. त्यामुळे यंदा विसर्जन कृत्रिम हौद, विसर्जन घाट निर्माण केले जाणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.
यंदा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती आणि आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळदेखील स्वीकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. त्याचबरोबर उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामूहिक महिला अथर्वशिर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशिर्ष पठण यांसह इतर कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले आहेत. अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग, असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेकदेखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरिता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव आणि गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्यासाठी एलईडी स्क्रिनची सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली.