जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली महापालिकेत भाजपची उलथवली सत्ता
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव
सांगली :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांना मिळाली 36 मते पडली.
फोडाफोडीच्या शक्यतेमुळे उत्सुकता शिगेला
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा – 78)
भाजप – 41
अपक्ष – 2
काँग्रेस – 20
राष्ट्रवादी – 15
सत्ताधारी भाजपमध्ये फूट
महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये
महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरू होत्या. गेल्या बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच, राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले. महापौर, उपमहापौर निवडीत सध्या ‘मनी पॉवर’ची चर्चा रंगली होती. भाजप आणि विरोधी आघाडीकडून घोडेबाजाराला ऊत आल्याचंही चित्र होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उलथवण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज होती.
सांगली महापौरपदासाठी कोण होते इच्छुक ?
सांगलीच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपली. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीत येऊन बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.