संजय राठोड यांच्यासाठी भाजपच्या सरपंचाचा राजीनामा

अंबेजोगाईतील काळवटी तांडा या गावच्या सरपंचाने भाजपवर गंभीर आरोप करत भाजपचा राजीनामा

0

मुंबई  : पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राठोड यांच्या समर्थनार्थ राज्यात अनेक जण पुढे येत आहेत. अशातच भाजपच्या सरपंचाने संजय राठोड यांचे समर्थन करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पूजा चव्हाण ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील असून तिने पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे थेट नाव घेऊन आरोप केला आहे. तसेच, सोशल मीडियावर या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे बंजारा समाज संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा या गावच्या सरपंचाने भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण असे या सरपंचाचे नाव असून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तसेच, वनमंत्री संजय राठोड यांचे समर्थनही केले आहे. ‘मी कमल नाथराव चव्हाण, काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे,’ असा आरोप कमल चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असून, पक्षाची प्रतिमा वाचविण्यासाठी राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेतील एक गट आग्रही आहे. तर, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली नसताना आपल्या मंत्र्यावर कारवाई कशाला, असा सवाल दुसऱ्या गटाकडून केला जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.