रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मुलीने मात्र राखला गड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून निसटल्या
जालना : केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून निसटताना दिसत आहेत. खासदार दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला निकालात धक्के मिळत असल्याचे दिसत आहे.
भोकरदन तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात पाच ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याने 86 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. या निडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्पा व अनेक महत्वाच्या ग्रामपंचायती असल्याने गावपातळीवरील स्थानिक नेत्यांसह विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दरम्यान सोमवारी (ता.18) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात अनेक मोठ्या व महत्त्वाच्या ग्रामपंचाय़तींत भाजपला धक्के बसताना दिसले. अनक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीतही दारुण पराभव मिळाल्याने हा एकप्रकारे हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच मोठा धक्का मानला जात आहे.