भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश, पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस
भाजप खासदार सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मंडल खान यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकारण वेग घेताना दिसत आहे. तृणमूलमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असतानाच, सोमवारी भाजप खासदाराच्या पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मंडल खान यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रिपोर्ट्सनुसार, यानंतर खासदार सौमित्र यांनी सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.
भाजपच्या डर्टी पॉलिटिक्समुळे घेतला निर्णय – सुजाता
सुजाता मंडल यांनी तृणमूलच्या जेष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपच्या डर्टी पॉलिटिक्समुळे तृणमूलमध्ये येण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आरोप लावला की, भाजपकडून मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद देण्याच्या आश्वासनावर भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले जात आहे.
यापूर्वी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला
गृहमंत्री अमित शाह शनिवारी आणि रविवारी बंगाल दौऱ्यावर होते. यादरम्यान, ममता बनर्जींचे जवळचे राहिलेले माजी मंत्री शुभेंदु अधिकारी यांनी शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, खासदार सुनील मंडल, माजी सांसद दशरथ तिर्की आणि 10 आमदारांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.