आक्षेपार्ह प्रश्न, अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार, योग्य ती कारवाईची मागणी - भाजप आमदार अभिमन्यू पवार

0

लातूर : बॉलिवूडचे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात हिंदू धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

सोनी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’  कार्यक्रमाचे अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहे. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कोणता धर्म ग्रंथ जाळला होता? असा तो प्रश्न होता आणि त्याला पर्याय हे विष्णुपुराण, भगवत गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती असे होते. हा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. या प्रश्नामुळे हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मीय व्यक्तींना धार्मिक आणि मानसिक आघात पोहोचला आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशात पाहण्यात आला आहे. असे प्रश्न उपस्थितीत करून हिंदू, धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणे हाच उद्देश स्पष्ट होत आहे, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तत्कालीन हिंदू धर्मांवरील, मनुस्मृतीवरील राग, मतभेद यांना उजाळा देऊन इतिहासातील जखमांच्या खपल्या काढून सौहार्दपणे एकमेकांसोबत राहणाऱ्या हिंदू-बौद्ध धर्मियांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न विचारण्यात आला आहे, असा दावाही पवार यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.