…हे फडणवीसांना सोयीस्कर आहे, भाजपा अंतर्गत सत्तासंघर्षाच एकतर्फी चित्र

0

अमेय  तिरोडकर  ( प्रसिद्ध पत्रकार ) :

एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हे भाजपमध्ये सुरुवातीपासून गोपीनाथ मुंडे गटाचे म्हणून ओळखले जात. तेव्हा हे दोन उघड गट होते. एक मुंडेंचा आणि दुसरा गडकरींचा. विनोद तावडे मुंडे गटाचे पण गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि मग त्यांच्या गटात गेले.

गडकरी नागपूरचे असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या वाढीला मर्यादा होत्या. त्यामुळे फडणवीस मुंडे गटाचे. मुनगंटीवार हे सुरूवातीपासूनच गडकरी गटाचे, आजही तिथेच आहेत. बावनकुळे तसेच गडकरी गटाचे. गिरीश महाजनांचे नेते मुंडे असले तरी नाथाभाऊ त्यांच्याच जिल्ह्याचे असल्याने महाजन गडकरीना पण धरून असत.

या निवडणुकीत खडसे, तावडे, बावनकुळे आणि राज पुरोहित यांची तिकिटं कापली गेली तेव्हा इथेच मी मुनगंटीवार जाऊन फडणवीस कसे प्रदेशाध्यक्ष झाले त्याची सविस्तर स्टोरी लिहिली होती. फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले आणि मग राज्याचे नेते म्हणून पुढे आले. तोवर फक्त ते विधानसभेत दुसऱ्या रांगेत बसणारे आणि टीव्ही डिबेट मध्ये चमकणारे अभ्यासू आमदार होते. फडणवीस मुंडे गटाचे होते म्हणूनच ते प्रदेशाध्यक्ष झाले हे निर्विवाद सत्य आहे.

नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमधल्या या मुंडे गटाची काय अवस्था झाली हे बघितलं पाहिजे. खरंतर, फडणवीसांच्या रूपाने मुंडे गटाचाच माणूस सीएम झाला होता. पण नंतरच्या काळात खडसेंना राजीनामा द्यावा लागला, पंकजाताईंचा चिक्कीचा मुद्दा समोर आला, प्रकाश मेहतांना राजीनामा द्यावा लागला!

एकप्रकारे मुंडे गट जो एकेकाळी महाराष्ट्र भाजपचा सूत्रधार होता तो या पाच वर्षांत विस्कळीत आणि कमजोर होत गेला. हे कधी? तर नेमके मुंडे गटाचेच फडणवीस राज्य भाजपची सगळी सूत्रं एकहाती हलवत असताना!!

असं होत असताना भाजपमध्ये मात्र एक नवा गट उदयाला येत होता. काही मुंडेंचे समर्थक, एक दोन गडकरी गटाचे आणि सत्तेच्या वळचणीला आलेले बाहेरचे काही असे मिळून हा फडणवीस गट बनला. मुंडे गट नाही म्हटलं तरी १९९० ते २०१५ या काळात म्हणजे जवळपास २५ वर्षांचा! फडणवीस गटाचे आयुर्मान साधारण साडे चार वर्षं!

इतक्या वर्षांची आपली पक्कड आपल्याच माणसाच्या उदयानंतर अशी हळूहळू कमजोर पडत चालली आहे याची सल मुंडे गटाला असणं साहजिक आहे. विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर पंकजाताई, नाथाभाऊ यांच्या या अस्वस्थतेचा आता जाहीर आणि एकत्रित उच्चार होऊ लागलाय.

होतं काय की गेल्या दोन दिवसांत माध्यमांत चित्र असं उभं केलं जातंय की पंकजा हरल्या, नाथाभाऊंची मुलगी हरली म्हणून हे सगळे एकत्र येतायत. यात सुप्तपणे आता यांची काही ताकद उरलेली नाही आणि हरलेल्यांचं हे रडगाणं आहे असं चित्र यातून तयार होतंय. हे फडणवीसांना सोयीस्कर आहे.

कोणी हे सांगत नाहीये की नेमके कोण एकत्र येत आहेत, त्यांच्या राजकारणाची मुळं कुठली, त्यांचं योगदान काय, हा पक्ष मागच्या पंचवीस तीस वर्षात उभा राहिला त्यात या मंडळींचा किती वाटा आहे, हे कोणीच बोलत नाही. आणि त्यामुळे सामान्य लोकांसमोर या भाजपच्या अंतर्गत सत्तासंघर्षाच एकतर्फी चित्र जातंय.

याला एक दुसरी बाजू आहे. जे देवेंद्र विरोधक आहेत तेही असं चित्र रंगवत आहेत की आता हे सगळे एकत्र आले म्हणजे फडणवीसांना लगेचच धक्का बसणार वगैरे. हेही तितकं खरं नाही. वस्तुस्थिती या दोन्हीच्या मध्ये आहे.

गेल्या चार वर्षांत दिल्लीच्या आशीर्वादाने पक्षाची सूत्रं जी फडणवीसांच्या हातात गेली होती ती पुन्हा एकदा सामूहिक नेतृत्वाच्या हातात यावी म्हणून ही सगळी धडपड आहे. कोअर कमिटी ही फक्त नावाला न उरता निर्णय प्रक्रियेवर या सगळ्यांचा प्रभाव असावा अशी इच्छा यामागे आहे.

मधल्या काळात भाजप पक्ष म्हणून खूप बदलला आहे. आता या पक्षाचे सगळे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय दिल्लीत होतात. भाजप किंवा मोदी शहा समर्थकांना हे आवडणार नाही पण हे काँग्रेसच्या हायकमांड कल्चरचं भाजपेयी व्हर्जन आहे. त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र येऊनही काही विशेष फरक पडणार की नाही हे भाजपच्या हायकमांडच्या हातात आहे.

फडणवीसांची सत्ता अनपेक्षितपणे गेली. त्यांनाही हा धक्काच होता. जर ते सत्तेत परतले असते तर हा गट गपगुमान बसला असता. पण ते आता इतक्यात तरी परतत नाहीत याचा अंदाज आल्यावरच या मंडळींनी ही उचल खाल्लेली आहे. हे टायमिंग इंटरेस्टिंग आहे. भाजपमधला येत्या काळातला अंतर्गत सत्तासंघर्ष असाच इंटरेस्टिंग असणार आहे!

* हे अर्टिकल अमेय  तिरोडकर  ( प्रसिद्ध पत्रकार) यांचे

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.