भाजपा नेत्याची मागणी : माझी सुरक्षा काढुन घ्या, ‘कोरोना’साठी वापरा
मुंबई : – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन करू नये यासाठी सध्या पोलिस दिवसरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांवर कायद्याचं पालन व्हावं यासठी अधिकच ताण आहे. कोरोनाचं संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे, अशा परिस्थितीत मला सध्या पोलिस सुरक्षा नको. माझी पोलिस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना केली आहे.
संदर्भात विनोद तावडे म्हणाले गेल्या आठवड्याभरापासून राज्यावर आलेल्या संकटाच्या परिस्थितीत पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे. अशाही काळात नागरिक आपले कर्तव्य विसरून वागत आहेत. अशा वेळी पोलिसांवरचा ताण अधिकच वाढतो आहे. म्हणून मला पोलिस सुरक्षा नको असा निर्णय मी घेतला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पोलिस प्रयत्नांची शिकस्त करत आहे. या कामात मदत व्हावी म्हणून मी माझी पोलिस सुरक्षा काढून घेण्याची विनंती मुंबई पोलिस आयुक्तांना केली आहे, असंही तावडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यातील इतर नेत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ची सुरक्षा कमी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या जोरात वाढायला लागली आहे. रविवारी ७४ कोरोनाबाधित होते. आज हा आकडा वाढून तो थेट ९७ वर पोचहला आहे. यावरून गुणाकार स्वारूपात कोरोना पसरतो आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने अत्यावश्यक काम नसता घरात बसणं कर्मप्राप्त झालं आहे.