‘मुंबईवर भगवा फडकवण्याच्या नादात वाढवतोय भाजप कोरोना ‘; घणाघाती आरोप
महाराष्ट्र व पं. बंगालबाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही, असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर
मुंबई : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, महाराष्ट्र व पं. बंगालच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही, असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. गर्दी, दाटीवाटी करत आहेत. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात भाजपवाले कोरोना वाढवत आहेत,’ असा घणाघाती आरोप शिवसेनेने केला आहे.
अद्याप दीड वर्षे लांब असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याचे आवाहन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळं शिवसेना दुखावली गेली आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. वाढीव वीजबिलांच्या विरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसेनेने हा निशाणा साधला आहे.’दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, असे मोदींनी म्हटले आहे. मात्र, आपल्या देशात दिव्याखाली अंधार आहे. कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदींच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीजबिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा केला. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे.
आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत आहे याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडते असे एका बाजूला बोंबलायचे आणि त्याचवेळी नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ आपल्या राजकीय विचारांची आहे, असे भाजपला वाटते. उठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे?,’ असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला.