आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपने धनगर समाजाला फसवले : नाना पटोले

भाजपने राज्यात सत्ता भोगली, पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक, असा आरोप

0

मुंबई : “धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे. काही लोकांनी प्रलोभने दाखवून या समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला, पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने 5 वर्षे राज्यात सत्ता भोगली, पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते इस्लाम जिमखाना येथे धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. 5 वर्षे राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार होते. असे असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते.” आता धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी, असे आवाहन करून नाना पटोले यांनी सन्मानाची वागणूक आणि समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

“हा आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात ऐकत कोणाचेच नाहीत. ते फक्त नागपूरचे ऐकतात. मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या. त्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा हा डाव आहे,” असाही आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोले म्हणाले, “धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत काँग्रेस पक्ष सकारात्मक आहे. धनगर समाजातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात सन्मान दिला जाईल.” यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक,  देवानंद पवार, अलकाताई गोडे, हरिभाऊ शेळके, ॲड. संदिपान नरोटे आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे प्रतीक असलेले घोंगडे व काठी देऊन नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.